नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे. देशातले एक महान आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख करुन दिली. शिकागो इथं १८९३ जागतिक धर्मपरिषदेतल्या भाषणानंतर त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली.

स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीत दिलेल्या उच्च योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वामी यांची शिकवण आजही तितकीच लागू पडत असल्याचं गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी कोलकाता इथं काल काढले.

प्रधानमंत्री आज हावडा जिल्ह्यात रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठ इथं एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.