नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या सर्व नियमित मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि उपनगरी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना येईपर्यंत स्थगित राहील, असं रेल्वेने जाहीर केलं आहे. येत्या ३० जून पर्यंतच्या गाड्यांमधे आरक्षित केलेल्या तिकिटांचे पूर्ण परतावे देण्यात येतील. मात्र श्रमिक विशेष गाड्या आणि १२ मे पासून सुरु झालेल्या विशेष गाड्यांची सेवा सुरु राहील.

या गाड्यांसाठी प्रवासाच्या सुरुवातीच्या स्थानकावर प्रवाशांचं स्क्रीनिंग होईल. कोविड-१९ ची लक्षणं किंवा खूप ताप आला असेल तर पक्कं तिकिट असलं तरीही प्रवाशाला गाडीत चढता येणार नाही. त्याचं तिकिट रद्द करुन पूर्ण रक्कम परत केली जाईल.

या गाडयांमधे तिकिटं आरक्षित करणाऱ्या सर्व प्रवाशांचे तपशीलवार पत्ते रेल्वे घेत आहे. भविष्यात त्यांच्यापैकी कोणाला संसर्ग झाल्याचं आढळलं किंवा बाधितांचे संपर्क शोधायची गरज पडली तर ही माहिती उपयुक्त ठरेल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.