मुंबई : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मुंबई, ठाणे आणि पालघर इथल्या स्थलांतरित कामगारांना खाद्यान्नाची पाकिटे वितरित करण्यासाठी दोन स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे. दहीसर (पूर्व) इथल्या राजश्री शाहू मानव विकास बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था आणि पालघरच्या आदर्श शैक्षणिक एवं सामाजिक संस्था यांच्यामार्फत 2500 खाद्यान्न पाकिटे वितरित करण्यात आली. यावेळी गृहमंत्रालयाने घालून दिलेल्या सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणाने पालन करण्यात आले.
कोविड-19 महामारीच्या विरोधात महाराष्ट्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने सकारात्मक भूमिका पार पाडली जात आहे. आयोगाच्यावतीने आत्तापर्यंत 10,850 मास्क बनवण्यात आले आहेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये असलेल्या 18 खादी संस्थांमार्फत सुती कापड वापरून हे मास्क बनवण्याचे काम करण्यात आले आहे. ‘स्फूर्ती’ (एसएफयूआरटीआय) योजनेखाली बनवण्यात आलेले हे सर्व मास्क वितरणासाठी जिल्हाधिका-यांकडे सुपूर्त करण्यात आले.
सध्याच्या संकटाची परिस्थिती लक्षात घेवून राज्यातल्या खादी संस्थेनेही आपले कारागीर आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशाच एका संस्थेने 55 कारागीरांना किराणा वस्तूंचा संच वितरित केला. यामध्ये गहू, तांदूळ, डाळी, तेल अशा वस्तूंचा समावेश होता. ‘एसएफयूआरटीआय’च्यावतीनेही 300 अन्नधान्याची पाकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच 601 कारागीरांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. यासाठी तीन खादी संस्थांनी एकत्र येवून सहा लाख एक हजार रुपयांचा निधी एकत्रित केला.
मुंबईस्थित महिला सहकारी संस्था श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड लिमिटेड या संस्थेने 24,231 कारागीरांच्या खात्यांमध्ये मिळून 18 कोटी 56लाख आणि 66 हजार रुपये विना परतीची रक्कम म्हणून जमा केले आहेत. त्याचबरोबर लिज्जत पापड गृह उद्योगाने पीएम केअर्स निधीमध्ये 50 लाख रुपयांचे आणि मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.