नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या याच कालखंडाच्या तुलनेत ३ पटींनी जास्त आहे. कोविड-१९ च्या महामरीशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राकरता ही दिलासा देणारी बाब आहे. गेली काही वर्ष राज्याला उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत होतं.

राज्यशासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की लघु, मध्यम आणि मोठे अशा एकूण ३ हजार २६७ प्रकल्पांमधे मिळून १७ हजार ६६ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. औरंगाबाद विभागातल्या ९ मोठ्या प्रकल्पांमधे ४३ पूर्णांक ९ दशांश टक्के साठा शिल्लक आहे.

जायकवाडी प्रकल्पात ४६ पूर्णांक ८९ शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  अमरावती विभागातल्या १० मोठ्या प्रकल्पात ४७ पूर्णांक ९५ शतांश टक्के, तर नागपूर विभागातल्या १५ मोठ्या धरणांमधे मिळून ५१ पूर्णाक ३४ शतांश टक्के साठा शिल्लक आहे. कोकण विभागात पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकूण ६ धरणांमधे ४९  पूर्णांक २८ शतांश टक्के तर नाशिक विभागातल्या २४ प्रकल्पात ४२ पूर्णांक ५८ शतांश टक्के  पाणीसाठा उपलब्ध आहे.

पुणे विभागातल्या २९ धरणांमधे ४० पूर्णांक १४ शतांश टक्के पाणी सध्या उपलब्ध आहे.