पुणे : राज्यात कोरोना विषाणू (कोविड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जादा बिलासंबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणा-या रुग्णांची संख्या लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजनेसाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम, १८९७ हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. तथापि, वाढती रुग्णसंख्या व भविष्यात उद्भवणारी उद्रेकजन्य परिस्थिती लक्षात घेता, खाजगी रुग्णालये यांच्याकडूनही रुग्णसेवा घेणे अपरिहार्य ठरले आहे. त्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहे व काही रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या व उपचार घेऊन गेलेल्या बऱ्याच रुग्णांच्या विविध प्रकारच्या मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक असलेल्या सदस्यांची जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत केली आहे. अतिरिक्त आयुक्त, आरोग्य, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त,आरोग्य, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे जिल्हा हे सदस्य आहेत तर जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सदस्य सचिव या नात्याने सर्व यंत्रणेशी समन्वय साधून प्राप्त होणा-या तक्रारीबाबत समितीचे अध्यक्ष/ सदस्य यांच्याशी समन्वय साधून प्राप्त तक्रारीचे योग्य ते निवारण करण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी आदेशित केले आहे.