नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसारामुळे तुरूंगातली गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आत्तापर्यंत ७ हजार २०० कैद्यांची तात्पुरत्या जामीनावर किंवा पॅरोलवर सुटका केली आहे. लवकरच आणखी एक हजार कैद्यांना सोडलं जाणार आहे.

तुरुंगातली गर्दी टाळण्यासाठी ज्यांना सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली आहे, अशा कैद्यांना सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेले अंदाजे ११ हजार कैदी राज्यातल्या तुरुंगात शिक्षा भोगत आहोत.

टाळेबंदीपुर्वी राज्यातल्या ६० तुरुंगात ३५ हजार कैदी होते. त्यापैकी १७ हजार कैद्यांना सोडण्यात येणार असल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं. याच नियमानुसार मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात कोरोनाबाधित आढळल्यामुळे ७०० कैद्यांना सोडण्यात आलं आहे.

अमरावती जिल्ह्यात मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी तिथल्या ११५ कैद्यांना पॅरोलवर सोडलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यात सात वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा झालेले आणि ज्यांचं वर्तन चांगलं आहे अशा कैद्यांचा समावेश आहे.