नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातले रिक्षाचालक अक्षय कोठावळे लग्नासाठी बचत करून ठेवलेले दोन लाख रुपये लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुर तसंच रस्त्यावर राहणाऱ्यांना अन्न पुरवण्यासाठी वापरत आहेत. मित्रांच्या सोबतीने कोठावळे या पैशातून दररोज अंदाजे चारशे जणांना अन्न पुरवत आहेत. यासोबतच ते आपल्या रिक्षातून ज्येष्ठ नागरिक तसंच गर्भवती स्त्रियांना रुग्णालयात मोफत पोचवण्याची सेवाही देत आहेत.

रिक्षात लावलेल्या ध्वनीक्षेपकावरून या आजाराबद्दल समाज जागृतीचं काम देखील ते करत आहेत. लॉकडाऊनमुळे कोठावळे यांचा २५ मेला होणारा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. मागच्या वर्षी सांगली-कोल्हापूर भागात आलेल्या पूरातही त्यांनी मदतकार्य केलं होतं.