नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ५ हजार ६११ एवढी, २४ तासातली सर्वाधिक वाढ नोंदली गेली. दिवसभरात १४० रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात सध्या १ लाख ६ हजार ७५० जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे तर आतापर्यंत तीन हजार ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला. ६१ हजार १४९ रुग्णांवर उपचार सुरु असून ४२ हजार २९७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ३९ पूर्णांक ६२ शतांश टक्के झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता असलेल्या एक लाख आठ हजार १२१ नमुन्यांची चाचणी केल्याचं, आयसीएमआर, अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं सांगितलं आहे. आतापर्यंत २५ लाख १२ हजार ३८८ नमुन्यांची चाचणी केली आहे.

राज्यात काल दिवसभरात २ हजार १२७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले, तर ७६ रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४३ जण मुंबईतले, १५ ठाणे, सहा पुणे तर तीन जण अकोला शहरातले आहेत. राज्यातल्या एकूण रूग्णांची संख्या ३७ हजार १३६ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ३२५ जण दगावले आहेत.

राज्यात गेल्या २४ तासात एक हजार दोनशेहून अधिक जणांना विविध रूग्णालयात कोरोनावर उपचार घेतल्यानंतर सुटी देण्यात आली. एका दिवसात बरे होणाऱ्या रूग्णांची ही सर्वात जास्त संख्या आहे.