नवी दिल्ली : देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ६ हजार ८८ इतकी विक्रमी वाढ झाली. देशातली एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ४४७ झाली असून ६६ हजार ३३० जणांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत १४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३ हजार ५८३ झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५३३ रुग्ण बरे झाले असून रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ४० पूर्णांक ९७ शतांश टक्के झालं आहे.
राज्यात काल आणखी दोन हजार ३४५ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातली एकूण रुग्णसंख्या ४१ हजार ६४२ इतकी झाली आहे , तर आतापर्यंत १ हजार ४५४ जण या आजारानं मरण पावले. राज्यात आतापर्यंत ११ हजार ७२६ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
मुंबईत काल एक हजार ३८२ रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णांचा आकडा २५ हजार ३१७ इतका झाला. ४१ रुग्ण मरण पावले. मुंबईच्या वर्सोवा कोळीवाड्यातले १०५ पैकी ८५ रुग्ण आज पूर्ण बरे होऊन घरी परतले. यामुळं हॉटस्पॉट ठरलेल्या या वसाहतीत आज आनंदाचं वातावरण आहे. रहिवाशांचं सहकार्य आणि ५ फीवर क्लिनिक्समुळे हे शक्य झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. आता घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी होणार आहे.
पुण्यात काल २६५ नवे रुग्ण सापडल्यानं एकूण आकडा चार हजार ८०९ झाला आहे. पुण्यात सात रुग्णांचा काल मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यात काल २६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ६७२ झाली आहे. जिल्ह्यात काल १० कोरोनाबिधित रुग्ण दगावले. यात एका महिला पोलीसाचाही समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १५१ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १ हजार ५६१ रुग्ण आहेत.
रायगड जिल्ह्यात काल एकाच दिवशी ५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २७० झाली आहे. काल तिथे ३३ नवे रुग्णही सापडले त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६२३ वर पोचली आहे. सध्या ३२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, काल जिल्ह्यातल्या तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं, एकूण मृतांची संख्या २६ झाली आहे.
नाशिक शहरात काल काल १२ तर, मालेगावात ११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ८९० वर पोचली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमधे एका ६ वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सव्वीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या १ हजार २१२ इतकी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातले रुग्ण कोरनामुक्त झाले आहेत.
जालना जिल्ह्यात आज सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात ५ रुग्णालयातले कर्मचारी, मालेगावात बंदोबस्तावरुन आलेला सुरक्षा दलाचा एक सैनिक आणि मंठा तालुक्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ५१ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात काल जळगाव शहरात २६, भुसावळ इथे ३ तर एरंडोल इथं एक असे एकूण तीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३८१ झाली आहे. यापैकी आत्तापर्यंत १३३ जण कोरोनामुक्तही झाले आहेत.कोप
सांगली जिल्ह्यात काल ८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात कालच मुंबईहून आलेल्या, आणि रुग्णालयात दाखल केलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ७० तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ झाली आहे. आत्तापर्यंत ३८ रुग्णांना ते कोरोनामुक्त झाल्यानं घरी सोडलं आहे, तर सध्या ३० जणांवर उपचार सुरु आहेत.
सातारा जिल्ह्यात काल २० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तिथल्या रुग्णांची संख्या २०१ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातले १०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ९१ जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत ४ जण कोरोनामुळे दगावले आहेत.
परभणीत काल चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आदा २० झाली आहे.
अहमदनगरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका वृद्ध महिलेचा कोरनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ६ झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात काल सहा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ११६ तर मरण पावलेल्यांची संख्या ६ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातले ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या ६७ जणांवर उपचार सुरु आहेत.