नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या आज होणार आहे. उभय देशांचे प्रधानमंत्री आज सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकल्पाचं उदघाट्न करतील.
भारत आणि नेपाळदरम्यान एक हजार ८५० किलोमीटरची सीमारेषा आहे. दोन्ही देशातून नागरिकांची ये-जा सुरु असते. यासह जोगबनी-विराटनगर आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र दोन्ही देशांमधल्या व्यापाराचं महत्वाचं स्थान आहे. २६० एकर जागेवर १४० कोटी रुपये खर्च करून ही तपासणी चौकी उभारली आहे. परदेशी नागरिकांसाठी इमिग्रेशन व्यवस्था, मालाच्या आयात निर्यातीसाठी सुविधा या चौकीमध्ये आहेत. दररोज सुमारे ५०० ट्रक येतील अशी व्यवस्था यात केलेली आहे.
नेपाळमध्ये भूकंपानंतर भारताच्या मदतीनं सुरु असलेल्या घर पुनर्निर्माण प्रकल्पाच्या प्रगतीचा नरेंद्र मोदी आणि के. पी. ओली आढावा घेतील. नेपाळच्या गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यात पन्नास हजार घरं बांधण्यासाठी भारतानं नेपाळला आर्थिक मदत दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ९१ टक्के घरं बांधून पूर्ण झाली आहेत.