सातारा : खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.
ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. याची कार्यवाही सुरू असतानाच दुर्देवाने कोरोनाचे महासंकट आले. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. कर्जमाफीची जी अंतिम यादी राहिलेली आहे, त्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांमध्ये कर्ज आहे या बँकांनी अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामध्ये राज्य सहकारी बँकेच्या वतीने आणि काही बँका स्वत:च्या फंडातून रक्कम उपलब्ध करतील. ही रक्कम कर्ज खात्यामध्ये गेल्यानंतर ते कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे राज्यभर कार्यवाही सुरू झाली आहे. साधारणपणे 11 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि साधारणपणे 8 हजार कोटींची रक्कम आहे. याचा निश्चित शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चित दिलासा मिळेल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.