मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४४४ गुन्हे दाखल झाले असून २३८ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४४४ गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C आहेत) नोंद २९ मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १८५ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३८ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०५ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे.
नाशिक ग्रामीण
नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील पेठ पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे,त्यामुळे सदर जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या १७ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर,कोरोना महामारीबाबत आणि त्यावरील उपचारांबाबत चुकीची व खोटी माहिती असणाऱ्या आशयाची पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे परिसरात अफवा पसरून संभ्रम निर्माण झाला होता.
ऑनलाईन मिटींग्जबाबत काळजी
सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच नागरिक Work From Home करत आहेत, त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या सर्व मिटिंग्ज ऑनलाईन करत आहेत. या ऑनलाईन मिटींग्ज करिता zoom, microsoft meetings, skype, cisco webex इत्यादी सॉफ्टवेअरस/apps वापरली जात आहेत, त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेष करून zoom app वापरणाऱ्यांना विनंती करते की हे ॲप वापरताना सावध राहा. सायबर भामट्यांनी zoom app सदृश काही malware व फेक अॅप्स बनवली आहेत. तुम्ही जर ती डाऊनलोड केली, तर तुमच्या सर्व मिटींग्ज रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या device (मोबाईल /संगणक) चा ताबा देखील हे सायबर भामटे घेऊ शकतात.
तरी सर्व नागरिकांनी झूम अॅप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही confidential माहिती अशा मिटींग्समध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी. मिटिंग ॲडमिनने मिटिंगचे Id व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत, तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ॲडमिन अथवा होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची login request accept करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.