नवी दिल्ली : महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून, कोणताही धोका नसल्याचं, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर, राज्य सरकारसंदर्भात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर थोरात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सरकार म्हणून तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत, सरकार स्थिर असून उत्तम काम करत आहे. याबाबत काहीही शंका काढण्याचा प्रश्न नाही, असं ते म्हणाले. काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत केलेली विधानं ही त्यांची वैयक्तिक मतं असल्याचं थोरात यांनी  स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असल्याचं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं आहे. काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मात्र उभय नेत्यांमधे काय चर्चा झाली, ते त्यांनी सांगितलं नाही. काल सकाळी झालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शरद पवार यांच्या बैठकीनंतर ही बैठक झाल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपा नेते नारायण रे यांच्या मागणीबद्दल राऊत यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली. गुजरात सरकार कोवीड १९ ची स्थिती अत्यंत वाईट पद्धतीनं हाताळत आहे, तिथ आधी केंद्र सरकारचं नियंत्रण आणावं, असं राऊत म्हणाले.