मुंबई : महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्वं, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्याला, स्मृतींना विनम्र अभिवादन केले आहे.

अभिवादन करताना श्री.पवार यांनी म्हटले आहे की, मुंबईत पायाभूत प्रकल्पांची उभारणी करताना, महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी स्वर्गीय देशमुख यांनी अविरत प्रयत्न केले. पुरोगामी, प्रगत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं. महाराष्ट्राची सर्वसमावेशक प्रगती हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी नियोजनबद्ध काम केले.

बाभळगावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या, केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडलेल्या देशमुख यांनी प्रत्येक पदाला न्याय दिला. महाराष्ट्राच्या जनतेने सोपवलेली जबाबदारी प्रत्येकवेळी यशस्वीपणे पार पाडली. राजकारण, समाजकारण, सहकार सर्वच क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्वं सिद्ध केले. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जनतेच्या मनातलं प्रेम, आदर, आपुलकी चिरंतन आहे. सर्वसामान्य जनतेशी जुळलेलं नातं अतूट आहे.

कृषी, उद्योग, अर्थ, सहकार, शिक्षण, आरोग्य सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला त्यांनी पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला. राजकारणात मतभेद असू शकतात, परंतु मनभेद असू नयेत हा विचार रुजवला, वाढवला. महाराष्ट्रात वैचारिक देवाणघेवाणीची राजकीय संस्कृती निर्माण केली. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे एक स्वप्नं बघितले होते. त्यांच्या स्वप्नातली मुंबई, महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वाला विनम्र अभिवादन.