नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ६४ हजार ४२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची लागण झालेले ६ हजार ३८७ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख ५१ हजार ७६७ झाली आहे. गेल्या २४ तासात या आजारामुळे १७० रुग्णांचा मृत्यू झाला असून, आता मृतांची एकूण संख्या ४ हजार ३३७ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांची  संख्या दिवसेंदिवस वाढत असून रात्री आलेल्या बाधित रुग्णांच्या अहवालानंतर एकूण रुग्णांची संख्या १००१ इतकी झाली आहे तर आज सकाळी आणि रात्री नाशिक शहरात दोन बधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे नाशिक शहरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आठ झाली आहे. तर  जिल्ह्यात आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झालेला आहे अर्थात जिल्ह्यात १००१ अशी आता पर्यंतच्या बधितांची संख्या झाली असली तरी बहुसंख्य म्हणजेच ७३५ रुग्ण बरे झाले असून सध्या २०९ रुग्ण उपचार घेत आहेत.

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा काल रात्री मृत्यू झाला. सदर व्यक्तीला मधुमेह होता. त्यामुळे जिल्ह्यातल्या मृत्यूंची संख्या २ झाली आहे.

रत्नागिरीच्या जिल्ह्यात काल रात्री उशिरा मिळालेल्या अहवालांनुसार रत्नागिरीत सहा आणि संगमेश्वर तालुक्यात दोन असे आठ करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या १८३ झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात आणखी ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या व्यक्ती भडगाव तालुक्यातल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४९९ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आणखी ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याच स्पष्ट झालं आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ७५ झाली आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५५ वर गेली आहे. मंगळवारी दिवसभरात एकूण आठ रूग्ण वाढले आहे.

परभणी जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी ३१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळं जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ६७ पर्यंत पोहचली आहे.

मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातल्या कोविड १९ च्या रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. त्यापैकी ९ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे बाधितांची संख्या एक हजार तीनशे साठ इतकी झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात निमखेड इथला एक प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. हा कर्मचारी मुंबईहून परत येताना लातूर इथल्या सहकाऱ्याच्या संपर्कात आला होता. या सहकाऱ्याचा कोरोनाअहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर या पोलिस कर्मचारी स्वत: शेतातच विलगीकरणात राहिला होता. आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच त्याला जिल्ह्यातल्या कोवीड सुश्रुषा केंद्रात दाखल केलं असून त्याच्या संपर्कातल्या सहा जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

सांगली जिल्ह्यात आज आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण खानापूर, शिराळा, कडेगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यातील असून जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ब्याण्णव झाली आहे.

धुळे जिल्ह्यात तीन रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडलं. यात शिरपूर तालुक्यातले दोन, तर धुळे शहरातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.