पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील एकाच कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. महापालिका परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सातत्याने हात धुवावेत. मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये. शहरात अद्यापही 20 ते 30 टक्के नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. त्यांनीही मास्क वापरावा. मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. आजपर्यंत नागरिकांनी सहकार्य केले आहे. यापुढे देखील नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. असे महापालिकाआयुक्त हर्डीकर म्हणाले,

शहराला राज्य सरकारने रेडझोनमधून वगळले आहे. त्यामुळे काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. रुग्ण संख्येतही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे शक्यतो गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे.