वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योग व व्यापार संघटनांसोबत घेतली बैठक
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्योग व व्यापार संघटनांसमवेत बैठक घेतली. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर केलेली टाळेबंदी आणि त्यानंतर त्यांच्या कार्यात दिलेली शिथिलता या गोष्टींचा परिणाम जाणून घेण्यासाठी आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याच्या त्यांच्या सूचनांची दखल घेण्यासाठी टाळेबंदीनंतरची संघटनांसोबतची ही पाचवी बैठक होती.
या बैठकीला वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश आणि एच. एस. पुरी तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. सीआयआय, फिक्की, असोचॅम, नॅसकॉम, पीएचडीसीआय, सीएआयटी, एफआयएसएमई, लघु उद्योग भारती, सियाम, एसीएमए, आयएमटीएमए, सिक्की, फेम, आयसीसी आणि आयईईएमए या संघटनांनी बैठकीत भाग घेतला.
या संघटनांना संबोधित करताना गोयल म्हणाले की, आपले भविष्य आपल्यालाच निवडायचे आहे; कोविडनंतरच्या काळात नाविन्यपूर्ण कल्पना, दृढ अंमलबजावणी योजना आणि भारताला जागतिक स्तरावर सामर्थ्यवान बनविण्यासाठी तयार राहून त्यानुसार कृती करणे हिताचे असेल. पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या ‘जान भी, जहां भी’ या विषयी बोलताना मंत्री म्हणाले की अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट स्थिती संपली आहे. गोष्टी सुधारत आहेत, पुनरुज्जीवित होत आहेत. ते म्हणाले की, आत्मनिर्भर मोहिमेअंतर्गत सरकारने उचललेली पावले अर्थव्यवस्थेच्या लढ्यात देशाला मदत करतील.
गोयल पुढे म्हणाले कि आत्मनिर्भर भारत हा आत्मकेंद्रित, बंदिस्त किंवा परदेशी विरोधी असणार नाही. त्याऐवजी या संकल्पनेत आत्मविश्वास असलेले स्वावलंबी आणि काळजीवाहू राष्ट्र आहे जे समाजातील सर्व स्तरांची काळजी घेते आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचे शिक्षण देते. उदारीकरणानंतरच्या गेल्या तीन दशकांत देशाची प्रगती झाली परंतु केवळ शहरांना केंद्रस्थानी ठेवण्याचे लक्ष्य होते. ग्रामीण व मागास भाग वंचित राहिले, तेथून लाखो लोकांना रोजगारासाठी व संधींसाठी शहरांमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले असे गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले कि आत्मनिर्भर भारत देशातील 130 कोटी नागरिकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करेल. हे भारतीय कंपन्यांना पाठिंबा देईल.
फर्निचर, खेळणी, स्पोर्ट्स शूज यासारख्या बऱ्याच नित्य वस्तूंसाठीही आम्ही आयात करीत आहोत ही बाब फार क्लेशदायक आहे. देशात तांत्रिक कौशल्य तसेच कुशल मनुष्यबळ असूनही ही परिस्थिती आहे. या गोष्टी बदलण्याची गरज आहे.
यासंदर्भात उद्योगांनी शाश्वत आणि चाकोरी बाहेरच्या नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे प्रयत्न करण्याचे आवाहन गोयल यांनी केले. ते म्हणाले कि कोविड -19 विरूद्धची लढाई सरकार एकटी लढू शकत नाही; हा देशाचा लढा असून सर्व संबंधितांना महत्वाची सकारात्मक भूमिका निभावण्याची गरज आहे. त्यांनी संघटनांना आश्वासन दिले कि त्यांच्या सूचनांची विधिवत तपासणी केली जात असून तर्कसंगत, अस्सल मागण्यांवर योग्य वेळी आवश्यक ती कारवाई केली जाईल.