नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले राज्यमहामार्ग आणि जिल्हे जोडणारे प्रमुख मार्ग यांच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी आशियाई विकास बँकेने १७ कोटी ७० लाख डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. याबाबतच्या करारावर आज केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अतिरीक्त सचिव समीरकुमार खरे आणि आशियाई विकास बँकेचे देशातील संचालक केनेची योकोयोमा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

साडेचारशे किलोमीटर्स लांबीच्या रस्त्यांच्या या प्रकल्पात ११ राज्य महामार्ग आणि ७ जिल्हे जोडणारे २ आंतरजिल्हा मार्ग येतात. या प्रकल्पामुळे राज्यातला शेतीप्रधान भाग औद्योगिक परिसराशी तसंच विमानतळ, रेल्वे आणि इतर सुविधांबरोबर जोडला जाणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आरेखन, देखभाल आणि सुरक्षितता विषयक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.