नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या महामारीविरुद्धच्या लढ्यात देश विजयपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रात भाजपा सरकार दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जनतेला उद्देशून लिहीलेल्या पत्रात प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे, की या लढ्यात भारताच्या कामगिरीनं सारं जग चकित झालं आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी आणण्याच्या प्रयत्नांचा वस्तुपाठही भारत जगासमोर ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षभरात आपल्या सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतले आणि देशाची वेगाने प्रगती झाली असं सांगून त्यांनी म्हटलंय की देशासमोर आणखी अनेक आव्हानं उभी असून त्यासंदर्भात खूप काही करण्याची आवश्यकता आहे. याकरता आपण अहोरात्र काम करत असून देशवासियांच्या क्षमतेवर आपला जास्त विश्वास आहे.
या लढाईत अनेक मजूर, छोटे व्यावसायिक, फेरीवाले इत्यादींना त्रास भोगावा लागला तरी आपण सर्व एकजुटीने तो दूर करू असं मोदी यांनी म्हटलं आहे. या कसोटीच्या काळात सर्वांनी नियम आणि सूचनांचं पालन करावं आणि संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
कोविड-19 नंतरच्या जगात आत्मनिर्भरता ही गरज आणि प्रगतीची संधी असल्याचं सांगून त्यादृष्टीनं सरकारनं दिलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा त्यांनी उल्लेख केला आहे. गेल्या वर्षभरात संसदेतली कार्यक्षमता वाढल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय की आता ग्रामीण- शहरी क्षेत्रातला फरक पुसट होत चालला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या २०१४ ते २०१९ या कार्यकाळात केलेल्या कामगिरीचा आढावा मोदी यांनी घेतला आहे. या काळात भारताचं जगातलं स्थान उंचावलं, गरीबांचा आत्मसन्मान वाढीला लागला, असं सांगून संरक्षण, आर्थिक समावेशन, गॅस आणि वीज जोडण्या, शौचालयांची सुविधा, एक देश एक कर, OROP, शेतकऱ्यांना वाढीव हमी भाव, इत्यादी सुधारणांचा उल्लेख त्यांनी केला. कलम ३७० रद्द करणं, त्रिवार तलाक विरोधी कायदा, नागरिकत्व सुधारणा कायदा, अयोध्या राममंदिर वादातला निवाडा या महत्त्वाच्या घटना या काळात झाल्या.
२०१९ मध्ये, अनेक दशकांनी, मतदारांनी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सरकारला पूर्ण बहुमत दिलं आणि इतिहास घडवला. सबका साथ सबका विकास या धोरणानंच देश प्रगती साधत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.