मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी दिले. कोरोना प्रतिबंधासाठी दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात स्वयंसेवकांची मदत घेण्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे शहर व जिल्हयातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील पथक पुणे जिल्ह्यात आज सकाळीच दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने आज पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र, हॉस्पीटल तसेच पुणे महानगरपालिका येथे भेट देवून पाहणी केली तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत एम्स नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह व डॉ. सितीकांता बॅनर्जी उपस्थित होते. तसेच बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सचिव कुणाल कुमार म्हणाले, पुणे जिल्हयात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत, झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. जेष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे का तसेच त्यांचा औषधोपचार व्यवस्थित सुरू आहे, याबाबतही कायम आढावा घेण्यात यावा, याकामी त्याच परिसरातील वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची नेमणूक करावी, जेणेकरून या कामात गती येईल व स्वयंसेवक त्याच भागातील असल्याने तातडीने उपाययोजना करणे सुलभ होईल असे सांगतानाच पल्स ऑक्सीमीटरचा वापर करण्यात यावा, संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. तसेच कोव्हीड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी. कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
पुणे शहरात कोणत्या हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, याचे डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहे, या डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना बेड उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. बेड व्यवस्थापन यंत्रणा तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन यंत्रणा अत्यंत गतिमान करा असे सांगून पुणे जिल्हयातील एकूण रुग्णसंख्या, परिसरनिहाय रुग्ण, रुग्णांमध्ये असलेले विविध आजार,रुग्णांचे वर्गीकरण,कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण त्याची कारणे,प्रतिबंधित क्षेत्राचा तपशील, घरोघरी झालेले सर्व्हेक्षण, कोवीड सेंटर, शासकीय तसेच खाजगी रुग्णालय स्थिती आदींचा आढावा घेण्यात आला. एम्स नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह यांनीही सविस्तर माहिती दिली.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या तसेच शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची माहिती दिली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.