नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या जागाबदलाचा केंद्राचा निर्णय हा देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं महत्व कमी करायच्या हेतूनं घेतल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. केंद्र सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी सूचना थोरात यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

हे वित्तीय सेवा केंद्र मुंबईत प्रस्तावित असताना ते गुजरातला नेत भाजपानं महाराष्ट्रद्रोहच केला आहे अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मोदी सरकारनं मुंबईतलं वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेण्याचा निर्णय घेतल्यावर राज्यातल्या भाजपा नेत्यांनीही या निर्णयाला पाठबळ दिल्याचा आरोप त्यांनी केला.