विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा दूधभुकटी प्रकल्पासंदर्भात बैठक

मुंबई : कोरोना संकटकाळातील लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या दूधभुकटी प्रकल्पासाठी दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मोबदला रक्कम अदा करावी. या संदर्भात एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस रक्कम थकीत राहता कामा नये यादृष्टीने सर्व स्तरावर दक्षता घेण्यात यावी, असे आदेश पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि भंडारा जिल्हा पालकमंत्री सुनील केदार यांनी संबंधितांना दिले.

विधानभवन येथे आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली दूधभुकटी प्रकल्पासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.केदार यांनी महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकांना त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले.

शेतीमाल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पुढाकाराने नाना पटोले आणि सुनील केदार यांच्या प्रयत्नातून हा दूधभुकटी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र पुरवठा केलेल्या दुधाचा मोबदला शेतकऱ्यांना तातडीने प्राप्त होणे आवश्यक असल्याने आवश्यक उपाय योजण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. दूध उत्पादकांच्या हितासाठीचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने अविरत सुरु रहावा. दूध उत्पादकांना तातडीने मोबदला मिळावा. तयार झालेली दूध पावडर व अन्य उत्पादन यांची उचित वाहतूक व्यवस्था व्हावी, यादृष्टीने या बैठकीत निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक नरेश गिते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.