नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. या चक्रीवादळात जिल्ह्यातली ५७ घरं ८ गोठे आणि इतर मालमत्तांची पडझड होऊन ३७ लाख १९ हजार ५०५ रुपयांचं नुकसान झालं आहे. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्यांचं नुकसान २४ लाख ५१ हजार इतकं आहे. वादळामध्ये  मत्स्य आणि बंदर विभागाचं, मच्छिमार, त्यांची जाळी, होड्या यांचं, तसंच शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झालं नाही अशी माहिती प्रशासनानं दिली.

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी ग्रामीण भाग आजही अंधारात असून वीज पुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी महामंडळानं अन्य जिल्हयातून कर्मचारी मागविले आहेत, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड आणि दापोली तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर  सुरु असून ते लवकरच पूर्ण होईल, असं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे.

वादळामुळे नुकसान झालेल्या मंडणगड आणि दापोली तालुक्यातल्या  सर्व ग्रामस्थांना मोफत धान्य पुरवठा करण्यात आला आहे, तसंच  पावसाळा सुरू होत असल्यानं घरांवर शाकारण्यासाठी प्लास्टिकचा कागद पुरविण्यात आला आहे.

विजेच्या बंद पडलेल्या ४७ पैकी ४४ उपकेंद्रांमध्ये वीजपुरवठा सुरू झाला आहे. मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावापासून वीस किलोमीटरपर्यंत  विजेच्या तारा आणि खांब पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानं खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचं काम सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली.