नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनं आपल्याला मोठा धक्का बसला. देशानं एक शूर पूत्र गमावला असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. बिपीन रावत हे शूर सैनिक आणि सच्चे देशभक्त होते. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या निधनानं आपल्याला तीव्र दुःख झालं आहे. देश त्यांच्या सेवेचं कायम स्मरण करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

बिपीन रावत यांच्या अचानक जाण्यानं भारताच्या सशस्त्र दलाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. आज देशासाठी दुःखाचा दिवस आहे. जनरल बिपीन रावत यांनी समर्पणवृत्तीनं देशाची सेवा केली. त्यांचं योगदान शब्दात मांडता येण्यासारखं नाही असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनीही बिपीन रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रावत यांनी देशाचं संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं. त्यांनी दिलेल्या सेवेचं देश कायम स्मरण करत राहील असं ठाकूर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.  भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.