मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.

मंत्रालयात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) पुरस्कृत परीक्षांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण देण्यात अग्रगण्य असलेल्या चाणक्य आयएएस अकॅडमी,दिल्ली आणि आदिवासी  विकास विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आदिवासी विभागाचे सह सचिव सुनिल पाटील, उप सचिव लक्ष्मीकांत ढोके,आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या आयुक्त नंदिनी आवाडे यांच्यासह चाणक्य अकॅडमीचे संचालक ए.के.मिश्रा, आदी उपस्थित होते.

डॉ. फुके यांनी यावेळी सांगितले,विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व पटवून त्यानुसार त्यांचा अभ्यासक्रम व शैक्षणिक उपक्रम तयार करणे, प्राथमिक शिक्षणाकरिता त्यांच्या मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध करुन देणे, विद्यार्थ्यांच्या आहार व आरोग्याची काळजी घेणे, वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी आयोजित करुन त्यांचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

 श्री. मिश्रा यांनी यावेळी येणाऱ्या काळात आदिवासी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना कशा पद्धतीने शिक्षण देणे गरजेचे आहे, याविषयीचे सादरीकरण केले. राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे संघ लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) पुरस्कृत परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर विचारविनिमय करण्यात आला.

येणाऱ्या काळात चाणक्य आयएएस अकॅडमीसोबत एकत्र काम करण्यासाठी आदिवासी विभागाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.