पुणे : ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून बारामती शहरातील नागरीकांच्या अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर पूर्ण होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. बारामती नगरपरिषद आणि अन्य संस्थांनी तयार केलेल्या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून टेलीमेडिसिन अॅप, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन ॲप, जीआयएस टॅगिंग या कामावर देखरेखीचं ट्रॅकिंग प्रणाली, आपत्कालीन स्थितीत वैयक्तिक बचावासाठी एसओएस ॲप, जीआरएस हे तक्रार निवारण प्रणालीसंबंधीचं ॲप एकत्र उपलब्ध होणार आहेत.