मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या कोविड 19 विरोधी लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आज एक पत्रक त्यांनी जारी केलं आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख कोविड विरोधी लढाईत अग्रभागी आहेत तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत अशी प्रशंसा त्यांनी केली.
निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेल्यांना पुन्हा उभं करण्यासाठी पक्षाचे 10 लाख कार्यकर्ते पुढं येतील असं त्यांनी सांगितलं. 2020 या वर्षात पक्ष शेती, शहरांचे प्रश्न, रोजगार निर्मिती, शिक्षण तसंच अल्पसंख्य आणि मागास वर्गियांच्या कल्याणासाठी काम करेल असा संकल्प त्यांनी जाहीर केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच मुंबई शहर अध्यक्ष नवाब मलिक यांनी आपापल्या मुख्यालयात स्थापना दिनानमित्त ध्वज फडकावला.