नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाली आहे. या आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५४ हजार ३३० झाली असून, सध्या १ लाख ४५ हजार ७७९ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आता सुमारे साडे सतरा दिवसांवर गेला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काल देशभरातून ११ हजार ४५८ ची भर पडली आणि एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखाच्या पुढं गेली. ही संख्या दहा दिवसांतच दोन लाखावरून तीन लाखांवर गेली आहे. देशातली रुग्ण संख्या चौसष्ट दिवसांनंतर एक लाखावर पोहचली होती. त्यानंतर पंधरवड्यात संख्येनं दोन लाखांचा टप्पा गाठला होता.
काल दिवसभरात ३८६ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या ८ हजार ८८४ झाली आहे. कोरोनाचा मृत्यू दर सध्या २ पूर्णांक ८७ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात देशभरात ७ हजार १३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.