कोरोना निदानासाठी चाचण्या वाढविण्याचे निर्देश
पुणे : कोरोना निदानासाठी करण्यात येणा-या चाचण्या वाढवा तसेच केलेल्या चाचण्यांचे अहवाल दुस-याच दिवशी प्राप्त झाले पाहीजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करून कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रम कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना चाचण्यांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. पुणे जिल्हयातही मोठया प्रमाणात चाचण्या होत आहेत, मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता कोरोना निदानासाठीच्या चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच या चाचण्यांचे अहवाल दुस-या दिवशीच प्राप्त झाले पाहिजेत, यामध्ये जास्तीचा कालावधी जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना श्री पवार यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, टाळेबंदीतील शिथिलीकरणानंतर यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे. कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्राधान्याचे आव्हान आहे. ती सजगता ठेवून कामे करावीत. जिथे उद्योग- व्यवसायांना परवानगी देण्यात आली तिथे लक्ष केंद्रित करून अधिक काळजी घ्यावी. असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासोबतच स्त्राव तपासणी क्षमता, पॉझीटिव्ह रुग्णसंख्या स्थिती, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंन्टेनमेंट झोननिहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, जेष्ठ नागरिकांची तपासणी, ग्रामीण भागातील स्थिती तसेच उपचारसुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक तथा साथरोग नियंत्रण चे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, लॉकडॉऊन परिस्थितीमध्ये शिथिलता आणल्यानंतर शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरात नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कंटेनमेंट झोनच्या बाहेर रुग्णसंख्या वाढत असून त्यादृष्टीने प्रत्येक पातळीवर प्रशासन नियोजन करत आहे. पुणे महानगरात आयसीयु तसेच व्हेंटीलेटर सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कंटेनमेंट झोनसोबतच लक्षणे असणारा कोणताही व्यक्ती कोरोना चाचणीतून सुटणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. लवकरात लवकर निदान होत असल्याने मृत्यूदर कमी होत आहे. येत्या काळात जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले, शहरात सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र निश्चित करुन त्यानुसार पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षित मनुष्यबळांचा पुरवठा करुन उपचार पध्दतीमध्ये बदल करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयाच्या सोईसुविधेबाबत सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुणे महानगरपालिका व पुणे विद्यापीठ यांच्या समन्वयाने विद्यावाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते नागरिकांच्या तपासणीची माहिती संकलन करणा-या ॲपचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.