राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन

मुंबई : राजमाता जिजाऊ माँसाहेबांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले. महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे राज्य, रयतेचे स्वराज्य स्थापन झाले. माँसाहेबांच्या ज्या विचारांनी शिवाजी महाराजांना घडवलं, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली, त्याच विचारांवर महाराष्ट्र आजपर्यंत घडला, यापुढेही घडत राहील. जिजाऊ माँसाहेबांचं विचार, संस्कार आपल्याला नेहमीच बळ, प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, गेली साडेतीनशे वर्षे हा महाराष्ट्र जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांवरच घडत आला आहे. माँसाहेबांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला. राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा दिली. कुठल्याही संकटावर मात करण्याचं बळ दिलं. शेती, शिक्षण, सहकार, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात आपला महाराष्ट्र आज आघाडीवर दिसतो, याचं मूळ जिजाऊ माँसाहेबांनी रुजवलेल्या स्वाभिमानाच्या विचारात, राष्ट्रासाठी त्याग करण्याच्या दिलेल्या संस्कारात आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी मोठ्या शौर्यानं, ध्येयानं, संयमानं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांचे तेच गुण प्रत्येक आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला बळ देतील, मार्ग दाखवतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.