मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेत लॉस एंजलिस इथं अटक करण्यात आली. भारत सरकारने गुन्हेगार हस्तांतरणाची विनंती केल्यावरुन १० जून रोजी ही कारवाई करण्यात आल्याचं अमेरिकेचे सरकारी वकील जॉन लुलेजियन यांनी सांगितलं.
११ जून ला त्याला कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याच्या जामीनावर येत्या ३० जून ला सुनावणी होणार आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेविड कोलमन हेडली याचा बालमित्र असलेला राणा मूळचा पाकिस्तानी नागरिक असून कॅनडाचा नागरिक आहे. यापूर्वी त्याला २००९ साली शिकागोमधे पकडलं होतं.
त्यावेळी डेन्मार्क मधे झालेल्या हल्ल्याबाबत तो दोषी ठरला होता मात्र मुंबई हल्ला प्रकरणी पुरेशा पुराव्याअभावी त्याला सोडलं होतं. त्यानंतर तो इलिनोईस मधे तुरुंगात होता.
गेल्या ७ मे रोजी त्याला कोरोना संसर्ग झाल्याचं आढळल्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून तुरुंगातून बाहेर सोडलं होतं. सध्या त्याची कोविड-१९ चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्याला क्वारंटीन केल्याचं सरकारी वकीलांनी सांगितलं.