महिला व बालविकास विभागाकडून लॉकडाऊन काळात मानसिक आधार; घरगुती हिंसाचाराच्या ४ हजार प्रकरणांत मदत

मुंबई : कोविड-१९ परिस्थितीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेले राज्यातील तसेच परराज्यातील मजूर, कामगार तसेच स्थलांतरितांना आर्थिक, मानसिक समस्या तसेच ताण-तणावावर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला व मुलांकरिता विशेष सहाय्य कक्षामार्फत मदत तसेच समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत २५ हजार १६३ व्यक्तींना समुपदेशन, मार्गदर्शन किंवा माहिती पुरविण्यात आली असून घरगुती हिंसाचाराच्या अनुषंगाने समुपदेशकांना प्रत्यक्ष तसेच हेल्पलाईनवर प्राप्त ४ हजार ६५ दूरध्वनी संदेशांच्या प्रकरणात मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामाची प्रशंसा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

कोरोना विषाणूमुळे मनात असलेली भीती,अस्वस्थता , कुटुंबाची काळजी, भविष्यातील अंधार, कुटुंबापासून लांब राहावे लागणार याची जाणीव, मानसिक ताणतणाव या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशनाची सेवा शासनाने उपलब्ध करून दिली. महिला व बाल विकास आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनास आयुक्तालयांतर्गत कार्यरत सर्व १२३ समुपदेशन केंद्रांची यादी, कार्यरत असलेल्या सर्व सोशल वर्कर्सच्या नाव आणि संपर्क क्रमांकासहित यादी उपलब्ध करून दिली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी याबाबतचे नियोजन केले आणि त्याप्रमाणे काम केले. हे  कक्ष तथा समुपदेशन केंद्रे पोलीस ठाण्यांच्या आवारात आहेत.

जिल्हा आणि तालुका स्तरावर जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या निवासी शिबिरातून राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले मजूर, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तर होतेच पण पर राज्यातील परत निघालेले मजूर मोठ्या प्रमाणात प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी आढळून आले. शिबिरात राहत असलेल्या सर्व स्त्री, पुरुष स्थलांतरित मजुरांना समुपदेशकांनी कोरोना विषाणूबाबतची माहिती तसेच घ्यायची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व, योग्य सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर, सॅनिटायझरचा वापर आदी माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली.

समुपदेशनाद्वारे मानसिकभावनिक आधार

कोरोना विषाणूबाबत शिबिरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भीती,अस्वस्थता होती तसेच कुटुंबाची, भविष्याची चिंता होती. या सर्व मानसिक ताण तणावावर  समुपदेशकांनी अतिशय कौशल्यपूर्ण काम करत समुपदेशनाच्या माध्यमातून भावनिक, मानसिक आधार दिला आणि त्यांचे मनोधैर्य वाढविले. वैयक्तिक मजुरांच्या  समस्यांवर काम केले. आर्थिक अस्थिरतेमुळे अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार  येत होते समुपदेशकांनी त्याना सकारात्मक विचार करायला शिकविले. काही ठिकाणी काहीही करून घरी परतण्याच्या तीव्र इच्छेने शिबिरातून मजूर पळून जात होते. त्याकरिता त्यांनी सहनशीलता दाखवावी आणि स्थानिक प्रशासनाला मदत करावी यासाठी त्यांच्याशी सातत्याने बोलून मदत करत होते. हे सगळे काम समुपदेशकांनी समुपदेशनाच्या विविध तंत्रांचा आणि अनुभवाचा वापर करून  केले.

मजुरांसोबत घेतले विविध उपक्रम – गटचर्चा

समुपदेशकांनी, सोशल वर्कर्सनी मजुरांच्या राहण्याची, जेवणाची नीट व्यवस्था आहे ना याबाबत स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली लक्ष पुरविले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोविड १९, व्यक्तिगत स्वच्छता, ताणतणावांचे नियमन याबाबत सत्रे घेतली. मजुरांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने, खेळ यांचासुद्धा वापर करण्यात आला.

विविध शासकीय यंत्रणाखासगी,  सामाजिक संस्था  यांच्यासोबत समन्वय

शिबिरातील  महिला व पुरुषांना आवश्यक असलेल्या कपडे , औषधे, जेवण, पाणी , कोरडे अन्नपदार्थ, अंथरूण- पांघरून आदी गरजेच्या वस्तूंसाठी समुपदेशकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विविध  सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी वैद्यकीय व्यवसायी आदी व्यक्ती आणि गटासोबत समन्वय आणि नेटवर्किंग करून साहित्य उपलब्ध करून दिले. विशेषतः महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स , इतर कपडे यांचीही व्यवस्था या माध्यमातून करण्यात आली.  काही ठिकाणी नेटवर्किंगच्या माध्यमातून नाश्ता, जेवणासाठी सोय करून दिली.

मजुरांच्या परतीच्या प्रवासासाठी मदत आणि मार्गदर्शन

लॉकडाऊनच्या काही टप्प्यानंतर शासनाने राज्यांतर्गत आणि राज्याच्या बाहेर प्रवासासाठी परवानगी दिल्यांनतर शिबिरातील बाहेरच्या राज्यात घरी जाऊ इच्छिणाऱ्या  मजुरांसाठी व राज्यांतर्गत जिल्ह्यात त्यांच्या राहत्या घरी जाण्याची वाट पाहणाऱ्या सर्व लोकांना  समुपदेशकांनी अनेक पातळीवर मदत केली. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देणे, ई-पास काढण्यात मदत करणे कागदपत्रांची पूर्तता करणे, प्रवासाची व्यवस्था करणे अशा सर्व पद्धतीने समुपदेशकांनी स्थलांतरित मजुरांना मानसिक, भावनिक आधार तर दिलाच पण त्यांनी आपापल्या घरी सुखरूप परत जावे यासाठी सुद्धा मदत केली. परतीच्या प्रवासासाठी लागणारे पाणी , कोरडा खाऊ, फूड पॅकेट्स दिली.

समुपदेशकांनी दूरध्वनीद्वारे हाताळली कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे

लॉकडाऊनच्या दरम्यान समुपदेशन केंद्र बंद होती. तरीसुद्धा केवळ महिलांचेच नाही तर पुरुषांकडूनही विविध कारणांसाठी मदत मिळावी यासाठी दूरध्वनी येत होते. कक्षामध्ये नोंद घेतलेल्या अर्जामधील वादी/प्रतिवादी तसेच नवीन कॉलर यांनी समुपदेशकांना संपर्क केला. कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी, रेशनचे अन्नधान्य मिळण्यासाठी, आपल्या घरी  पोहोचण्यासाठी मदत मिळण्यासाठी, आर्थिक अडचण, कोविड-१९ मुळे ताणतणाव आणि भिती अशा विविध कारणासाठी आलेल्या फोन कॉल्स मध्ये समुपदेशकांनी हस्तक्षेप केला. तर काही प्रकरणांमध्ये रेशन, वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे.  फक्त कॉलर व्यक्तीलाच नाही तर त्या विभागात राहणाऱ्या इतर कुटुंबानाही रेशनचे धान्य पुरविण्यात आले आहे.

लॉकडाऊनमध्ये घरी सर्व असल्यामुळे महिलांना कामाचा अतिरिक्त भार, आर्थिक चणचण, काही ठिकाणी कौटुंबिक अत्याचार वाढू लागला. अशावेळी त्या घरातून बाहेर पडू शकत नव्हत्या. महिलांवरील हिंसा थांबविण्यासाठी महिलेच्या नवऱ्याशी व कुटुंबाशी समुपदेशकांनी बोलणे केले आहे. काही महिलांना आश्रय गृहाची सेवा,तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरणाची सेवा मिळवून देण्यासाठी मदत पुरविण्यात आली. काही प्रकरणात पोलीस आणि संरक्षण अधिकाऱ्यांच्या मदतीने महिलेची सुटका करून पोलीस कम्प्लेंट तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत ‘डोमेस्टिक इन्सिडन्स रिपोर्ट’ (डीआयआर) भरून न्यायालयात दाखल करण्यात आले.

मला बोलायचे आहे‘ हेल्पलाईनने केले बोलते

महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र शासन पुणे आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्याकरिता कार्यरत असणारे समन्वयक आणि ‘व्हीएडब्ल्यू कक्ष’ कार्यक्रम अधिकारी  यांनी हिंसाचारग्रस्त महिलांसाठी ऑनलाईन मंच ‘मला बोलायचे आहे’ या हेल्पलाइनद्वारे समन्वयकांनाही मदतीसाठी/चौकशीसाठी फोन कॉल्स प्राप्त झाले. स्थानिक महिला समुपदेशन केंद्रांच्या सहाय्याने व इतर स्टेकहोल्डर्स च्या नेटवर्किंग ने हस्तक्षेप करण्यात आला व समुपदेशन करण्यात आले.