नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशा स्वयंसेवक आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. त्यानुसार  आशा  स्वयंसेवकांच्या मानधनात २ हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात 3 हजार रुपये कायमस्वरूपी वाढ  होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

७१ हजार आशा कार्यकर्त्यांना याचा फायदा होणार आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज बारा निर्णय घेण्यात आले. कोविड-१९ च्या पश्चात राज्यात उद्योग वाढीसाठी,  उद्योगांना आकर्षित करण्याच्या उपाययोजनांची आखणी तसंच एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करायचा निर्णय, आज मंत्रिमंडळानं घेतला.

त्याचप्रमाणे गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना आणि रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करायलाही ही मंत्रिमंडळानं  मान्यता दिली. फलोत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार  आहे. २०१९-२० या हंगामासाठी हमी भावानं खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारे अदा करण्यासाठी ,बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यासाठी कापूस पणन महासंघाला शासन हमी द्यायला मंत्रमंडळानं आज मंजुरी दिली.

समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, राज्याचं  बीच शॅक धोरण तयार करायला मंजुरी त्याचप्रमाणे नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचं ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्यासाठी राज्य सरकारचा सहभाग द्यायला मान्यता, माहिती तंत्रज्ञान आणि  माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत मुदतवाढ, हे निर्णयही मंत्रिमंडळानं घेतले.

महाराष्ट्र वस्तू आणि  सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर व्दितीय सुधारणा अध्यादेश, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका आणि  नोकऱ्यांवरच्या कर अधिनियम १९७५ मध्ये सुधारणा करणाऱ्या अध्यादेशाला मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली.