नवी दिल्ली : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज परवानगी दिली.
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्यांचा निकाल त्यांच्या या परीक्षेतल्या कामगिरीनुसार घोषित केला जाईल, तर ज्या विद्यार्थ्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली असेल त्यांना ज्या तीन विषयात उत्तम गुण असतील त्यांच्या सरासरीच्या आधारे गुण दिले जातील, तर ज्यांनी तीन विषयांची परीक्षा दिली असेल त्यांना ज्या दोन विषयात उत्तम गुण असतील त्यांच्या सरासरीच्या आधारे गुण दिले जातील, असं मंडळ आणि केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.
या पद्धतीनं मिळालेले गुण ज्यांना समाधानकारक वाटत नसतील त्यांना नंतर दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचा पर्याय खुला आहे, असं त्यांनी सांगितलं. आईसीएसई बोर्डानंही अशा प्रकारची सूट न्यायालयाकडे मागितली होती. १० वी आणि १२ वी चे निकाल जुलैच्या मध्यापर्यंत जाहीर केले जातील असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.
महाराष्ट्र, दिल्ली तामीळनाडूसारख्या राज्यांनी या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं सीबीएसई ला परीक्षा रद्द करण्याची अधिसूचना काढायला परवानगी दिली.