मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनील या रामदेव बाबांनी तयार केलेल्या औषधाला आयुष्य मंत्रालय, आयसीएमआर यांनी अद्याप नाहरकत पत्र दिलेले नाही, त्यामुळे या औषधांचा साठा राज्यात कोठेही आढळल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल, असा निर्धार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
कोरोना आढावा बैठकी नंतर सांगली येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. पालक मंत्री जयंत पाटील हे यावेळी उपस्थित होते.
पंढरपूर येथे आषाढी वारीच्या वेळी शासकीय महापूजा करायची की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अस सांगून अनिल देशमुख म्हणाले, कोरोना महामारीतून पांडुरंगाने महाराष्ट्राला वाचवावे असच साकड घातले जाईल. तसेच पुढीलवर्षी दिंडीतून वारकरी म्हणून जाता याव अशी अपेक्षा आहे.
मास्क न घालता तसेच सामाजिक अंतर न पाळता आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते गाड्या उडवत बेकायदा जमाव करत असतील तर त्यांच्यावर रीतसर कारवाई केली जाईल, असे सांगून देशमुख म्हणाले, नागपूर येथे दलित कार्यकर्त्याची ची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्याय करणारे कोणत्याही समाजाचे असलेतरीही त्यांची गय केली जाणार नाही, कोरोनाची रोगराई आटोक्यात आल्यानंतर राज्यात पोलीस भरती केली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केल.