नवी दिल्ली : ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा यासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या पदक विजेत्यांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून रोख पारितोषिकं दिली जातात. ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधल्या पदक विजेत्या आणि त्यांच्या प्रशिक्षकांना विशेष पारितोषिके’ या योजनेअंतर्गत ही पारितोषिकं दिली जातात.

ऑलिम्पिक स्पर्धांमधल्या सुवर्ण पदक विजेत्यांना 75 लाख तर रौप्य पदक विजेत्यांना 50 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना 30 लाख रुपये देण्यात येतात. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्याला 30 लाख, रौप्य पदक विजेत्याला 20 लाख तर कांस्य पदक विजेत्याला 10 लाख तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या सुवर्ण पदक विजेत्याला 30 लाख, रौप्य पदक विजेत्याला 20 लाख आणि कांस्य पदक विजेत्याला 10 लाख रुपये देण्यात येतात.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजीजू यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

जागतिक करंडक स्पर्धेत 4 वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना 40 लाख, रौप्य पदक विजेत्या खेळडूंना 25 लाख तर कांस्य पदक विजेत्यांना 15 लाख रुपयाचे पारितोषिक देण्यात येते.

सांघिक क्रीडा प्रकारासाठी देण्यात येणाऱ्या पारितोषिकाची योजना कबड्डी या खेळासाठीही लागू आहे.