पुणे :  श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  श्रावण महिन्यात येणा-या भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगतानाच बसेसच्या माध्यमातून भाविकांना प्रवास सुखकर होईल, असा विश्वास वित्त व नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
विधानभवन येथे श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखडाअंतर्गत मिडी बसेसचा लोकार्पण सोहळा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, ‍जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपवनसंरक्षक ए.लक्ष्मी, विभाग नियंत्रक श्रीमती जोशी आदी उपस्थित होते.

वित्त व  नियोजन मंत्री मुनगंटीवार म्हणाले, श्रावण महिना व यात्रा कालावधीत संपुर्ण देशभरातून मोठया प्रमाणात भाविक भिमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी वाहतूक व परिवहनाच्या असणा-या सोई अपु-या होत्या. त्यामुळे विकास आराखडयात वीस मिडी बसेसचा समावेश करण्यात आला. श्रावण महिन्यातच या बससेवेला प्रारंभ होत असल्याने भाविकांसाठी ही बससेवा नक्कीच आनंददायी ठरेल.

राज्यात सर्व ज्योर्तिलिंगाचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भिमाशंकरचा या विकास आराखडयात प्राधान्याने समावेश करण्यात आला असून भिमाशंकरच्या सर्वांगिण विकासासाठी निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी भिमाशंकर विकास आराखडयातील कामे पुर्ण करण्यासाठी लक्ष द्यावे. अशा सुचनाही वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.

प्रास्ताविक विभाग ‍नियंत्रक श्रीमती जोशी यांनी केले. यावेळी नागरिक, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.