नवी दिल्ली : टोकिओ येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रीडापटू आणि संघांची तयारी करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रात क्रीडा विषयक सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी विविध राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीरं आयोजित करण्यात येत आहेत. प्रशिक्षण सुविधा, साधने आणि उपकरणे, आहारासंदर्भात मार्गदर्शनही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंना सज्ज करण्यासाठी एनएसएफ, टीओपीएस या योजनांद्वारे निश्चित करण्यात आलेल्या गुणवान खेळाडूंना परदेशात प्रशिक्षण घेता यावे, त्यांना परदेशातल्या स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
देशात खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरण 8 ते 25 वयोगटातल्या क्रीडापटूंसाठी प्रोत्साहनात्मक योजना राबवत आहे.
सध्या देशातल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रांमध्ये 27 क्रीडा प्रकारांमध्ये 14,236 गुणवान क्रीडापटूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये 4269 मुलींचा समावेश आहे. महिला खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक अशा तीन प्रशिक्षण केंद्रात केवळ महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजीजू यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.