नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात सरकार आणि प्रशासनादरम्यान समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाण्यात आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातल्या वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या रद्द होणं हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांदरम्यान ताळमेळ नसल्याचं निदर्शक आहे, असं ते म्हणाले. ठाणे शहर आणि परिसरातल्या कोविड विषयक परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कार्यालयाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्याचा विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

पनवेल, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भायंदर या महानगरपालिका क्षेत्रांमधे संसर्ग अधिक प्रमाणात असून, मृतांची खरी आकडेवारी समोर आलेली नाही, असा दावा त्यांनी केला. राज्यात चाचण्यांचा वेग वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोक-यांमधे आरक्षणाची तरतूद मिळावी, यादृष्टीनं सर्वोच्च न्यायालयात राज्यशासनानं पूर्ण तयारीनिशी जाणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

राज्य सरकारला हवी ती मदत करायला आपण तयार आहोत. हे सरकार आपण पाडणार नाही, तर अंतर्गत मतभेदामुळे ते पडेल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.