सुमारे १५,२०० अनुज्ञप्ती व त्यावर अवलंबित सुमारे १ लाख मनुष्यबळास दिलासा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
मुंबई : घाऊक विक्रेत्यांकडून मद्य खरेदी करून त्याची विक्री करण्याची परवानगी अनुज्ञप्तीधारकाना मिळावी अशी विनंती राज्य शासनाकडे करण्यात आली होती. सध्या उद्योगक्षेत्रावरील आर्थिक अडचणी व रोजगार टिकविण्याच्या दृष्टीने कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पुढील आदेशापर्यंत घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करून सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे राज्यातील सुमारे १५,२०० अनुज्ञप्ती व त्यावर अवलंबित सुमारे १ लाख मनुष्यबळास मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील परवाना कक्ष (नमुना एफ एल -३ अनुज्ञप्ती) तसेच बिअरबार (ई – अनुज्ञप्ती) व वाईन बार (ई -२ अनुज्ञप्ती) अनुज्ञप्तीना त्यांच्याकडे दि. २४ मार्च, २०२० अखेर असलेला मद्यसाठा संपेपर्यंत वैध परवानाधारकांना सीलबंद बाटलीमध्ये मद्य विकण्याची परवानगी १९ मे, २०२० रोजी घेतलेल्या निर्णयानुसार काही अटी व शर्तीवर देण्यात आली होती. यानंतर ४ जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार या अनुज्ञप्तीधारकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास परवानगी देण्यात आली होती. बहुतांश, अनुज्ञप्तीधारकांकडे मद्यसाठा संपला होता/संपत आला होता. परिणामी सदर उद्योगक्षेत्रे व त्यावर अवलंबित रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आज घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करून सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मद्यविक्रीच्या वेळी कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी लावलेल्या सर्व अटी व शर्ती यापुढेही कायम राहतील.