पुणे : आंबेगाव तालुक्यातील कोवीड १९ ची परिस्थिती व भविष्यात वाढणाऱ्या रूग्णांचे नियोजन करण्यासाठी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंचर येथे बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, पोलिस उप अधीक्षक विवेक पाटील, उप विभागीय अधिकारी जितेंद्र डूडी, उप विभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, आंबेगाव तालुक्यात वैद्यकीय सेवा देणारे डॉ.सुनिल खिवंसरा, डॉ.नरेंद्र लोहकरे, डॉ.सचिन गाडे, डॉ.हर्षद शेटे, डॉ.लीना गुजराथी, डॉ.खेडकर, डॉ.महेश गुडे हे उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे व इतर शहरांमधून येणारे लोक कोरोना बाधित सापडत होते. मात्र, आता स्थानिक लोक कोरोना पॉझिटीव्ह मिळू लागले आहेत. तालुक्यात सध्या २० ते ४० वयोगटातील रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत गेल्यास आवश्यक उपाययोजनांचे संपूर्ण नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले.
पुण्यातील रूग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या वाढल्याने तालुक्यातील रूग्णांवर तालुक्यातच उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्याचे नियोजन झाले. यासाठी तालुक्यात एक हजार बेडची व्यवस्था करण्याचे बैठकीत ठरले. भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पीटल बरोबरच एखादे खाजगी हॉस्पीटल घेऊन कोरोनाचे रूग्ण दाखल करता येवू शकतील. या कामात तालुक्यातील खाजगी डॉक्टर मदत करण्यास तयार असून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊन शिथील केले असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सध्या रस्त्यावर खूप गर्दी होवू लागली आहे. तालुक्यातील जनतेला हात जोडून विनंती आहे की सहजतेने घेवू नका. आपली दैनंदिन कामे करताना आवश्यक काळजी घ्या, असे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
इतर तालुक्यांच्या तुलनेत आंबेगाव व जुन्नर तालुका सुरक्षित आहे. हा असाच सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर तपासणी, आयसोलेशन व जनतेमध्ये जनजागृती या गोष्टींकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.