नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : WHO नं, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केलेली आपली धोरणं, उपाययोजना आणि विविध देशांकडून याबाबत मिळणारा प्रतिसाद यांचा आढावा घेण्यासाठी, एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.

या अभूतपूर्व महामारीनं सगळ्यांनाच दणका दिला असून तिचं व्यापक मूल्यांकन होणं गरजेचं आहे, असं संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानोम घेब्रायसीस यांनी, ही समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करताना सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटना, चीनच्या हातातलं बाहुलं आहे अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर टीका केल्यानंतर आणि संघटनेचं सदस्यपदच सोडल्याच्या पार्श्वभूमीवर, संघटनेनं हे पाऊल उचललं आहे.

न्यूझीलंडच्या माजी प्रधानमंत्री हेलेन क्लर्क आणि लायबेरियाचे माजी अध्यक्ष एलेन जॉनसन सर्लीफ, या समितीचे प्रमुख असतील, आणि ते इतर सदस्यांची निवड करतील.

विविध देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक बैठकीत ही समिती आपला मध्यावधि अहवाल, तर पुढच्या वर्षी मे मध्ये अंतिम अहवाल सादर करेल.

जगभरात १ कोटी २० लाखांहून जास्त कोरोनाबाधित रुग्ण असून, ५ लाख ४८ हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधितांचा, या आजारानं मृत्यू झाला आहे.