नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झायडस कॅडिला या कंपनीनं आपल्या झायकोव्ह डी या covid-19 विरुद्धच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. भारत बायोटेकनंतर लस तयार करणारी ही दुसरी भारतीय कंपनी आहे. झायडस कॅडिला आणि जैवतंत्रज्ञान संशोधन परिषद संयुक्तरित्या ही लस विकसित करत आहेत.
झायकोव्ह डी या लसीच्या पहिल्या आणि दुसर्या् टप्प्यातल्या निरोगी मानवावर चाचण्या सुरू झाल्या असल्याचं जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेनं म्हटले आहे. या टप्प्यात लसीची सुरक्षितता, प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची क्षमता, प्रमाण तपासले जाईल.
प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचं जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेनं सांगितलं आहे. झायकोव्ह डी लसीच्या मानवी चाचण्या सुरू होणं हा आत्मनिर्भर भारत योजनेतला मैलाचा दगड असल्याचं जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेच्या अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप यांनी म्हटले आहे. ही लस कोरोनाची साथ परतवून लावायला भारताला स्वावलंबी बनवेल असं मत झायडस कॅडीलाचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी व्यक्त केलं आहे.