नवी दिल्‍ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज इस्त्रायलचे संरक्षणमंत्री लेफ्टनंत जनरल बेन्जामिन गॅन्त्ज यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.दोन्ही नेत्यांनी यावेळी दोन्ही देशांमधील सामरिक आणि राजनैतिक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. संरक्षण क्षेत्रातील दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ कसे करता येतील, याबद्दलच्या शक्यतांवर चर्चा केली.

तसेच, कोविड-19 विरुद्धच्या लढाईदरम्यान, संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात, सुरु असलेल्या सहकार्याबाबत देखील दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. या संशोधनाचा लाभ केवळ दोन देशांनाच नाही, तर संपूर्ण मानवजातीला होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संरक्षण उपकरणांच्या उत्पादनात, थेट परदेशी गुंतवणूक अधिक मुक्त करण्याच्या भारताच्या नव्या धोरणाचा लाभ घेत, इस्त्रायलच्या संरक्षण कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आमंत्रण राजनाथ सिंह यांनी यावेळी दिले. दोन्ही मंत्र्यांमध्ये यावेळी प्रादेशिक घडामोडींवरही चर्चा झाली. शक्य होईल तेव्हा भारतात येण्याच्या, राजनाथ सिंह यांच्या आमंत्रणाचा, इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वीकार केला.