नवी दिल्ली : दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव द्यावा, दूध उत्पादकांना प्रति लिटर मागे दहा रुपये अनुदान द्यावं, तसंच दूधाच्या भुकटीसाठी पन्नास रुपयांचं अनुदान द्यावं या मागण्यांसाठी आज राज्यभरात भाजपाच्या नेतृत्वात विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
अहमदनगर जिल्ह्यातली विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. अकोले तालुक्यात दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं दगडाला तर तर पुणतांबा इथं किसान क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजाच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करण्यात आला. अनेक ठिकाणी, शेतकऱ्यांनी जनावरांना चावडीवर बांधून, दूध ओतून देत सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते.
सांगली जिल्ह्यात मल्हारपूर – पंढरपूर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून गाईला दुधाचा अभिषेक घालण्यात आला, तर करगणीमध्ये मोफत दुधाच वाटप करून सरकारविरोधी घोषणा दिल्या गेल्या. जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते.
नांदेड जिल्ह्यात भाजपाचे तालुका अध्यक्ष निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आला.
उस्मानाबादेत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या.
परभणीत दुध उत्पादकांच्या मागणीसाठी शहरातल्या उड्डाणपुलावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते.
बुलडाणा जिल्ह्यात चिखली, खामगाव, तसंच जळगाव जामोद शहरात गोरगरीब वस्त्यांमध्ये दुधाचे घरोघरी वाटप करून आणि सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज आणि वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव इथं भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, काही आंदोलकर्त्यांना पोलिसांनी अटकही केली.
बीड जिल्ह्यात कडा इथं आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झालं. जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात शिवसंग्राम संघटनाही सहभागी झाली होती. यावेळी अनेक ठिकाणी गरजुंना दुधाचं वाटप केलं गेलं.
नंदुरबार शहरात कलम १४४ लागू असल्यानं, पोलीसांनी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना आंदोलनाआधीच ताब्यात घेतल्यानं तिथे हे आंदोलन बारगळं.
गडचिरोलीत चार्मोशी इथं आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली, तर जिल्ह्यात इतरत्रही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून सरकारचा निषेध केला.