अकोला आणि वाशिम येथील स्थानिक रहिवासी बीएसएनएलबरोबर टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर म्हणून भागीदारी करू शकतील आणि आत्मनिर्भर बनू शकतील : संजय धोत्रे
मुंबई : केंद्रीय दूरसंचार, मनुष्यबळ विकास, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी महाराष्ट्रातील अकोला येथे बीएसएनएलच्या भारत एअर फायबर सर्व्हिसेसचे उद्घाटन केले. यामुळे अकोला येथील इंटरनेट वापरकर्त्यांना मागणीनुसार वायरलेस इंटरनेट जोडणी मिळतील. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून बीएसएनएलकडून भारत एअर फायबर सेवा सुरू केली जात आहे आणि 20 केएम अंतरापर्यंत वायरलेस कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे उद्दीष्ट आहे. अशा प्रकारे बीएसएनएलद्वारे स्वस्त सेवा मिळाल्यामुळे दुर्गम ठिकाणच्या ग्राहकांना फायदा होईल. या व्यतिरिक्त, या सेवा वायरलेस आहेत आणि स्थानिक पातळीवर सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता खूपच कमी आहे. या सेवा इतर ऑपरेटरंपेक्षा खास आणि वेगळ्या आहेत कारण बीएसएनएल अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग उपलब्ध करुन देत आहे. बीएसएनएलने अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना या दर्जेदार आणि परवडणार्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
भारत एअर फायबर सर्व्हिस दुर्गम भागातील ग्राहकांना रेडिओ वेव्हद्वारे शेवटच्या मैलापर्यंत पोहचण्यातील दरी साधून अतिवेगवान ब्रॉडबँड सेवा प्रदान करत आहे. बीएसएनएलने नजीकच्या टेलिफोन एक्सचेंज किंवा मोबाईल टॉवरपर्यंत ऑप्टिकल फायबरचे विशाल जाळे टाकले आहे आणि तेथून ग्राहकांना वायरलेसद्वारे जोडणी दिली जाते. या व्यतिरिक्त, बीएसएनएलने या अतिवेगवान ब्रॉडबँड सेवेसाठी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील स्थानिक उद्योजक / बेरोजगार तरुणांना महसुलात वाटा देण्याबाबत करार केला असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देत आहे. ते दरमहा सुमारे एक लाख रुपये नियमित मासिक उत्पन्न मिळवून त्याद्वारे केंद्राच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत स्वावलंबी बनू शकतील. हे मॉडेल संपूर्ण भारतात राबवण्यात येत आहे.
बीएसएनएलने विशेषत: ही वायरलेस भारत एअर फायबर सेवा अकोला येथून सुरू केली आहे. अकोला व वाशिम शहरात सर्वत्र रस्ता रुंदीकरणाच्या कामांमुळे आणि रस्ते जोडण्यामुळे बीएसएनएलची अखंड इंटरनेट जोडणी मिळण्यात अकोला आणि वाशिममधील नागरिकांना अडचणी येत होत्या. अकोला व वाशिम जिल्ह्यात बीएसएनएल अकोलाचे 435 बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (बीटीएस) आहेत, त्यापैकी 193 बीटीएस हे 4G बीटीएस असून या जिल्ह्यांचा बहुतांश भाग व्यापला आहे. केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी उर्वरित 28 गावे देखील यात समाविष्ट करण्याची सूचना केली असून लवकरच दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोबाईल कव्हरेज असेल. या दोन जिल्ह्यांतील ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यासाठी इतर विशेष कामांव्यतिरिक्त बीएसएनएलने पूर्ण कव्हरेजसाठी आणखी बीटीएसची योजना आखली आहे.
बीएसएनएल भारत एयर फायबर कनेक्टिव्हिटीची गती 50 एमबीपीएस आहे. बीएसएनएल वायरलाइन आणि वायरलेस विभागांमध्ये आकर्षक ब्रॉडबँड योजना देत आहे. महानगरांमधून ग्रामीण भागात स्थलांतर होत असल्यामुळे सद्य परिस्थितीत हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवेची मोठी मागणी आहे. लॉकडाऊन दरम्यान वर्क फ्रॉम होम (डब्ल्यूएफएच), ई-लर्निंग, ऑनलाइन शॉपिंग, गेमिंग आणि करमणूक इत्यादीमुळे ही सेवा लोकप्रिय होत आहे.
ही सेवा ग्रामीण भागासाठी परिवर्तन घडवणारी ठरू शकते कारण इंटरनेट आणि सेन्सर यांचे एकात्मीकरण करून मातीतील आर्द्रता रिअल-टाइम आधारावर जाणून घेता येईल जेणेकरून सिंचनाचे नियोजन केले जाऊ शकते, परिणामी पाण्याची बचत होईल आणि त्याद्वारे उत्पादकता वाढेल. तसेच, दुभत्या जनावरांच्या मानेवर सेन्सर बांधले जाऊ शकतात, ज्यामुळे शरीराच्या तापमानाचे सतत नोंद करणे शक्य होईल जेणेकरुन कुठ्ल्यावेळी दूध जास्त आले हे जाणून घेता येईल.
उल्लेखनीय म्हणजे, बीएसएनएलने जुलै,2020 महिन्यात महाराष्ट्र परिमंडळात सुमारे 14,500 एफटीटीएच कनेक्शन दिले आहेत. बीएसएनएलने कोविड कंट्रोल रूम्स, जिल्हा कोविड रुग्णालये, हेल्पलाईन व देशभरातील कॉल सेंटर्सना चोवीस तास हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन दिले आहेत.
वेब बैठकीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांमध्ये बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार, सीएफएबीएसएनएलचे संचालक विवेक बन्जाल, मनोजकुमार मिश्रा, सीजीएम महाराष्ट्र सर्कल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. महाबीज अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी,या वेळी उपस्थित होते.