नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात झाली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिकमधल्या देवळालीपासून बिहारमधल्या दानापूरपर्यंत जाणाऱ्या पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

किसान रेल्वे सेवेमुळे नाशवंत कृषी मालाची कमी दरात वहातूक करणं शक्य होणार असून त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा यावेळी तोमर यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेल्या अशा विविध योजनांमुळे शेतकरीवर्ग आत्मनिर्भर होईल, अशी आशा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.

ही किसान रेल्वेगाडी  दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवळालीहून सुटेल आणि शनिवारी संध्याकाळी दानापूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दानापूर इथून रविवारी दुपारी १२ ला निघून सोमवारी संध्याकाळी देवळालीला पोहोचेल. नाशिक, मनमाड, भुसावळ परिसरातल्या फळं, फुलं, भाजी, तसंच  कांदा उत्पादकांना या सेवेचा फायदा होणार आहे.