पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुणेकरांसमवेत घेतला.  ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकल्यानंतर श्रोत्यांशी बोलताना ते म्हणाले.

“मोदी सरकारच्या कार्यकाळातील ही दुसरी ‘मन की बात’ होती. आणि माझ्या असं लक्षात आलंय की लोक यातून खूप प्रभावित झाले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी झाली आहे. पंतप्रधानांनी पुस्तकांविषयी चर्चा केली. जलसंरक्षण, जलसंचय, जलसिंचन, पाणी बचत याविषयीही चर्चा केली. कॅन्सरशी लढून जे जिंकले आणि खेळाडू बनले त्यांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.  चांद्रयानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला तसेच अंतराळ क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी एका स्पर्धेचीही घोषणा केली. स्वच्छतेप्रती पंतप्रधान नेहमी आग्रही असतात. लोकशाही मजबूत करणाऱ्या काश्मीरमधील यशस्वी पंचायत निवडणुकांविषयीही पंतप्रधान बोलले. अधिकारी कसे गावात जाऊन राहिले आणि त्यांनी लोकांच्या अडचणी कशा समजून घेतल्या ते ही पंतप्रधानांनी सांगितले. श्रावणाचा आनंद लुटण्याचेही आवाहन पंतप्रधानांनी केले. तसेच त्यांनी 15 ऑगस्ट ला लोकोत्सव बनवण्याचे आवाहन ही केले.”