पुणे : महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता वव्यवसायासंबंधी नवकल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्येभाग घेण्यास राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान (NULM), महिला आर्थीक विकास महामंडळ (MAVIM)व उमेद- महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवन अभियान (MSRLM) या अंतर्गत तयार केलेले पंचसूत्रीचे पालन करणारे ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गट पात्र असतील. या संधीचा लाभ सर्व महिला बचतगटांनी घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक अनुपमा पवार यांनी केले आहे.

पुणे जिल्हयामध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून पहिल्या टप्प्यांतर्गत जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये माहिती सत्रांद्वारे स्पर्धेविषयी माहिती देण्यात येत आहे. या योजनेचा दुसरा टप्पा हा तालुकास्तरीय कल्पना सादरीकरणाचा असून यामध्ये विजयी होणा-या बचतगटांना प्रत्येकी रु.52 हजार 500 अर्थसहाय्य (रु.2 हजार 500 भत्त्यासह) उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्हास्तरावरील कल्पना सादरीकरण सत्रात सहभागी होण्यास तालुकास्तरावरील विजयी बचतगट पात्र असणार आहेत.

जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हास्तरावर कल्पना सादरीकरण आयोजित करण्यात येईल व त्याद्वारे विजयी होणा-या बचतगटांना प्रत्येकी रुपये 2 लाख अर्थसहाय्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तरी, या संधीचा लाभ सर्व महिला बचतगटांनी घ्यावा, असेही पुणे कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या सहायक संचालक तथा हिरकणी योजनेच्या नोडल अधीकारी अनुपमा पवार यांनी कळविले आहे.