पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागामार्फत सन 2019 करीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचेकडून खालील प्रमाणे पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
दिव्यांग व्यक्तींना सन 2019 चे पुरस्काराचे अर्जाचे वाटप हे दिनांक 31 जुलै 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून उपलब्ध करुन देण्यात येतील. अर्जदाराकडून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज दिनांक 10 ऑगस्ट 2019 पूर्वी स्विकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाही. अर्ज हे 15 ऑगस्ट 2019 पूर्वी आयुक्तालयास सादर करावयाचे असल्याने वेळेत अर्ज करावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
पुरस्काराचा प्रकार पुढीलप्रमाणे-
उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउदयोजक दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था, दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था, प्रतीथ यश व्यक्ती ( रोल मॉडेल ) दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेल्या उत्कृष्ट संशोधन/ उत्पादन/ निर्माती, दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहित वातावरण निर्मिती करणारे कार्यालय/ संस्था, दिव्यांग व्यक्तीना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट कार्यकरणारे दिव्यांग, बालक उत्कृष्ट ब्रेल छापखाना, उत्कृष्ट सहज साध्य संकेतस्थळ, दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट राज्य, क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी दिव्यांग व्यक्ती असा आहे.
या योजनेच्या अर्जाचा नमुना केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईट उपलब्ध आहे. तरी पात्र व्यक्तींनी आपले अर्ज त्याबरोबर आपल्या कार्याची माहिती 150 ते 200 शब्दापर्यंत इंग्रजी व हिंदी मध्ये व दिव्यांगत्वाच्या दाखल्यासह तीन प्रतीत या कार्यालयात सादर करण्यात यावेत, असेही पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कळवले आहे.